भारतीय नौदलाकडून या दुर्घटनेवर निवेदन जाहीर करत बाजू मांडण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. या पुतळ्याचे वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.अशात समुद्र किनारी असलेला पुतळा पडल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महाविकास आघाडीकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते म्हणाले,’राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यानंतर या दुर्घटनेचे खापर एकमेकांवर फोडण्याचा उद्योग सुरु झाला आहे. राज्य सरकारने या पुतळ्याची जबाबदारी भारतीय नौदलाची असल्याचे स्पष्ट केले होते. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन पुतळ्याची उभारणी करणाऱ्या आणि देखरेख करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.