Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे, तर लाच देऊन…; अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानाने ‘वादंग’

पुणेः अभिनेते राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर चौहूबाजूंनी टीकेची झोड केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते, अशा आशायाचे विधान राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने वादंग निर्माण झाला आहे. याबाबत अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या विधानाचा निषेध नोंदवत त्यांच्या विधानावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
सोलापूरकर हैवान असल्याचे सिद्धः मिटकरी
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सभागृहात करणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी ट्विट्मध्ये म्हटले आहे. तसेच राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु “हैवान” असल्याच सिद्ध केलंय. छ.शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान, आपल्या विकृत मानसिकतेतुन इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतल्या जाणार नाही. असे देखील मिटकरी म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2025
सोलापूरकर कोण महामूर्ख?
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, अशा तिखट शब्दांत आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या विधानावरून प्रतिक्रिया देत माफी मागावी असे म्हटले आहे.
हा राहुल सोलापूरकर काय बोलतोय आइका .
ही हिंम्मत ह्यांच्यात येते कुठून.
ह्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी https://t.co/PGFufo8gjN pic.twitter.com/3dPMscMkWF— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2025
आव्हाडांकडून ‘तो’ व्हिडिओ शेअर
सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटेकेवर जे विधान केले आहे त्याचा व्हिडिओ आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. हा राहुल सोलापूरकर काय बोलतोय आइका. ही हिंम्मत ह्यांच्यात येते कुठून. ह्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी व्हिडिओच्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती, असे विधान त्यांनी एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये दिलेले आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्व स्तरातून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.





