Chhatrapati Sambhajiraje : “स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो…”; संभाजीराजेंचा थेट भाऊ-बहिणींवर हल्लाबोल!

Chhatrapati Sambhajiraje : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला 19 दिवस उलटून गेले तरीही अद्याप यातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. यात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे देखील सहभागी झाले आहेत.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारच्या कामकाजावर निशाणा साधला आहे. “वाल्मिक कराडला संरक्षण देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही? मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झालं? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? एक व्यक्तीला घाबरत आहे, यामागे कोण आहे? आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का? शोधून काढले तर दोन मिनटं लागतात. कराडच्या संपर्कात कोण आहे? त्याचे खास सबंध कुणाचे आहे?,” असे सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी थेट मुंडे बंधू-भगिनींचा उल्लेख केला. “स्वत: पंकजा मुंडे यांनी सभेत सांगितलं होतं की, वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. आज पंकजा मुंडे या देखील या घटनेबाबत जास्त बोलत नाहीत. मग जे बीडमध्ये चाललंय ते तुम्हा दोघांनाही पटतंय का? ही माणुसकीची हत्या आहे. असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.
स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो….
“बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो. स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो आहे. हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही,” असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
अजित पवारांवर साधला थेट निशाणा
“अजितदादा तुम्ही प्रकटपणाने बोलला असाल माझी काम करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही आता काम करून दाखवा. तुमची हिंमत असेल. तुमच्या धमक असेल तर आता काम करून दाखवा. एक एक वार केलेत. भयंकर वार केलेत. फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?” असा सवाल संभाजी राजे यांनी विचारला.




