ZP Politics : राजकारणात विजय मोठ्या फरकाने असो किंवा एका मताने त्याचे महत्त्व समान असते. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी एका मताने जिंकलेल्या सदस्याचे वजन किती वाढते, याचा अनुभव सध्या जिल्हा परिषदेतील वडगाव कोल्हाटी गटातील सदस्य सचिन कल्याणराव गरड घेत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी देताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्र बी-फॉर्म दिल्याने युतीत विसंवाद दिसून आला. वडगाव कोल्हाटी गटात भाजपचे इच्छुक असलेल्या सचिन गरड यांना अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली आणि गरड यांनी केवळ एका मताने विजय मिळवला. त्यांच्या या विजयाचा समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. निवडणुकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जिल्हा परिषदेत राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पाठिंब्याने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र भाजपने हा डाव हाणून पाडत स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला. हेही वाचा – MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून ‘या’ नावांची चर्चा या निर्णायक टप्प्यावर सचिन गरड यांनी भाजपला पाठिंबा देत “मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो, तरी मी भाजपचाच आहे,” अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यात मदत झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्यानंतर विषय समिती सभापती पदांच्या निवडीत भाजपने गरड यांच्या पाठिंब्याची परतफेड केली. त्यांना थेट अर्थ व बांधकामसारख्या महत्त्वाच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली. सभापतीपदी निवड झाल्यानंतर गरड यांनी पक्षाने दिलेला विश्वास प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, “त्या वेळी एका मताने विजय मिळाला नसता, तर आज ही संधी मिळाली नसती,” अशी कबुलीही त्यांनी दिली.