Sambhajinagar : खवड्या डोंगरावरील प्रकरणावर कुणालच्या आत्याची प्रतिक्रिया; अवघा महाराष्ट्र सुन्न…
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये कुणाल चांदगुडे, त्याचे वडील आणि आई यांच्या मृत्यूने खळबळ. राखी पौर्णिमेपूर्वी बहिणीने भावाच्या आठवणीत आक्रोश केला.

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात 18 वर्षीय कुणाल चांदगुडे याने कौटुंबिक वादानंतर खवड्या डोंगरावर जे काही केलं त्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
‘दादा, आता मी कुणाला राखी बांधू रे…’
मुरलीधर चांदगुडे यांना तीन बहिणी आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून भाऊ-बहीणांची भेट झाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेला भेटण्याचे ठरले होते. मात्र, त्याआधीच मुरलीधर यांचा मृत्यू झाल्याची बातमी बहिणींना मिळाली.
ही बातमी समजताच एका बहिणीने आक्रोश करत, “दादा, आता मी कुणाला राखी बांधू रे… दहा दिवसांवर आलेल्या पौर्णिमेला राखीसाठी कोणाला फोन करू रे?” असा टाहो फोडला. भावाच्या विरहाने तिचे डोळे पाणावले.
सहा वर्षांपूर्वी एका मुलाचा मृत्यू –
मुरलीधर चांदगुडे यांना दोन मुलं होती. त्यापैकी एका मुलाचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. आता दुसरा मुलगा कुणाल याचाही दुर्दैवी अंत झाला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांनाही जीव गमवावा लागला.
मुरलीधर हे ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांनी कुणालला आयफोन घेऊन दिला होता. मात्र, कुणालला अपडेटेड आयफोन हवा होता. त्यातच जुन्या आयफोनचे हप्तेही रखडले होते, अशी सुरूवातीला माहिती समोर आली होती.
ट्रकचालक असल्याने मुरलीधर यांना कामानिमित्त वारंवार बाहेर राहावे लागत होते. घरी आल्यानंतर कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती आहे. सुमारे तीन महिन्यांनंतर ते घरी परतल्यानंतर पुन्हा वाद झाले आणि गेल्या दोन दिवसांपासून घरात भांडण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय?
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे. सुरुवातील आयोफोनमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. मात्र पोलिसांनी आयफोनचे कारण नसल्याचे सांगितले आहे. आता नेमकं कारण काय होतं याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र आयफोन घेण्यासाठी किंवा हप्ते थकल्याचे हेच मूळ कारण नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. प्राथमिक तपासात आयफोन किंवा मोबाईल हा आत्महत्येचा कारणीभूत घटक असल्याचं स्पष्ट झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.





