Chhath Puja : पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजेचा जल्लोष ; उगवत्या सूर्याला नमन करत हजारो भाविकांनी केली व्रताची सांगता

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरातील सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपळे सौदागर, भोसरी, मोशी, चिंचवड, पिंपरी यासह सर्वच ठिकाणी नदी काठावर आणि तलावांच्या किनारी छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छठ पूजेच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला नमन करत हजारो भाविकांनी या व्रताचा पारणा केला.शहरात हजारोंच्या संख्येने बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशातील पूर्वांचल परिसरातील नागरिक वास्तव्यास आहेत. सर्वांना छठपूजेसाठी आपल्या गावी जाणे शक्य होत नाही.
ते येथेच छठपूजा करत असतात. सोमवारी सायंकाळी मावळत्या सूर्यास अर्ध्य अर्पण केल्यानंतर मंगळवारी सकाळी उगवत्या सूर्याला नमन करत या व्रताची सांगता करण्यात आली. पहाटेपासूनच घाटांवर भाविकांची गर्दी झाली होती. पाण्यात उभे राहून महिला लोकगीतांच्या माध्यमातून सूर्यनारायणास लवकर दर्शन द्यावे, अशी विनंती करत होत्या. सूर्यनारायणाचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर कठीण उपवासाचे देखील उद्यापन झाले. सुमारे ३६ तासांचा कठीण उपवास या व्रतादरम्यान केला जातो.
सूर्यदर्शन झाल्यानंतर फटाकडे वाजून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील छठपूजा करणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली, तसेच त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. यावेळी विशेष गव्हाचे पीठ, गूळ, साखर, दूध यांचे मिश्रण करून बनविलेला प्रसाद ठेकुआ सर्वांना वाटण्यात आला.
सांगवी, दापोडी, पिंपळेगुरव परिसरातील भाविकांसाठी ब्रजेश यादव, कमलेश गुप्ता, प्रदीप गुप्ता, सुनील गुप्ता, अनिल गुप्ता, गणेश गुप्ता, मदन गु्प्ता, आरती यादव, रामसिंग यादव, राजू यादव, फुलचंद यादव यांनी महाप्रसाद वाटला. दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी व पोलीस कर्मचारी जयदीप सोनवणे, अरविंद जाधव, धोंडोराम किंडरे, ऋतुजा नाईकरे त्याचबरोबर विद्युत विभागाचे अनिल मुलगीर यांनी सहकार्य केले.
पिंपळे सौदागरमध्ये उत्साहाचे वातावरण..
पिंपळे सौदागर येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने महादेव मंदिरा शेजारील पवना नदी घाटावर छट पूजेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी छठ पूजेसाठी महापालिकेकडून नदी घाटाची साफ सफाई करण्यात आली. छठपूजे दरम्यान पिंपळे सौदागरमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या प्रसंगी माजी नगरसेवक नाना काटे यांचा उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक विलास पाडाळे, युवा नेते उमेश काटे, सोनिगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनिगरा, जितेंद्र सोनिगरा तसेच आयोजक ब्रिजेश सिंह, दुर्गेश कुमार सिंह, राकेश गुप्ता, विनयकुमार गुप्ता, विजय चौहान,अमरजीत सिंह, मानसिंह, विजय बहादूर प्रजापती, अजय कुमार गुप्ता,जनार्दन सिंह यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्िति होते.





