भैरवनाथ मंदिर तळ्याकाठी छटपूजा उत्साहात साजरी

वाघोली – मावळत्या सूर्याला फळांचा नैवेद्य व अर्घ्य देत उत्तरभारतीय नागरिकांकडून छटपूजा वाघोली येथील भैरवनाथ तळ्याकाठी उत्साहात साजरी करण्यात आली. वाघेश्वर मंदिर तळ्याकाठी छटपूजा कार्यक्रम यावर्षीही रद्द करण्यात आल्याने भैरवनाथ तळ्यावर लहान मुलांपासून वृद्धांनी गर्दी केली होती.
वाघेश्वर मंदिर तळ्याकाठी होणारा छटपूजा कार्यक्रम रद्द झाल्याने काही नागरिकांनी घरीच कृत्रिम हौद तयार करून छटपूजा साजरी केली. वाघोलीसह चंदननगर, खराडी, लोहगाव परिसरातील नागरिकांनी भैरवनाथ तळ्याकाठी उपस्थिती लावून घरामध्ये सौख्य नांदू दे अशी प्रार्थना सूर्यदेवाला केली. भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. भाविक महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य दिले तर फळाचा नैवेद्य सूर्यदेवाला केला गेला.
पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, हवेली तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव पाटील यांच्या सहकार्याने भैरवनाथ तळ्या लगत छटपूजेसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.





