Chhagan Bhujbal : ‘आंदोलन कुठेही कर, पण नियमात कर!’ मनोज जरांगेंच्या आंदोलनाला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या गणेशोत्सवात (२९ ऑगस्ट) मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी मुंबईत जाणार आणि मागण्या मान्य होईपर्यंत परतणार नाही,” असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत भुजबळ म्हणाले, “आंदोलन कोण आडवतंय? जालना, अंतरवाली सराटी, मुंबई किंवा दिल्ली, कुठेही करा, पण नियमात करा. संविधानाने आंदोलन आणि उपोषणाचा अधिकार दिला आहे. भाषणं करा, पण कोणतीही कुरघोडी करू नका. मराठा समाजाला जे आरक्षण देता आलं, ते दिलं. आता आणखी काय हवं? इतर समाजात कोणी शिरकाव करेल, तर ते सहन करणार नाहीत. OBC समाजात कुणी ढवळाढवळ केली, तर आम्ही गप्प बसणार नाही.” भुजबळांनी मराठा आणि OBC समाजातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करत जरांगे यांना नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला.
सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वादग्रस्त नेते सूरज चव्हाण यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीवरून भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,“सूरज चव्हाण यांनी पक्षासाठी अनेक वर्षं काम केलं आहे. त्यांनी चुकीचं वर्तन केलं, त्याची माफी मागितली. एखाद्याला कायमस्वरूपी शिक्षा देणं किंवा लांब ठेवणं योग्य नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली.” भुजबळांनी चव्हाण यांच्या नियुक्तीचं समर्थन करताना पक्षाच्या अंतर्गत निर्णयावर ठामपणे पाठराखण केली.
ध्वजारोहणावरूनही चर्चा
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने (१५ ऑगस्ट) राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांना ध्वजारोहणाची जबाबदारी दिली होती. यानुसार, भुजबळांना गोंदिया येथे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती, तर गिरीश महाजन यांना नाशिक येथील ध्वजारोहणाची जबाबदारी मिळाली होती.
मात्र, भुजबळांनी आपल्या इच्छेनुसार नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण केलं. याबाबत विचारलं असता, भुजबळ म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये ध्वजारोहण करतो. इतर ठिकाणी जाणं मला शक्य नाही. ध्वजारोहण कुठेही करा, आपला तिरंगा एकच आहे. झोपडपट्टीत जरी झेंडा लावला, तरी तो आनंद आहे. या विषयावर आता चर्चा बंद करा.





