“आम्ही तत्व पाळली”; समीर भुजबळांच्या अपक्ष उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक – समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. त्याने निवडणुकीत उभे राहण्याबाबत मला विचारले होते. मी त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार त्याने सर्व पदांचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. समीर भुजबळसाठी आम्ही सुद्धा घड्याळ निशाणी घेतली असली, पण आम्ही तत्व पाळले. त्यामुळे समीर भुजबळने सर्व पदांचा राजीनामा देऊन अर्ज भरला असून अपक्ष लढणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
शिंदेंनी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यावर भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये त्यांनी इगतपुरी, दिंडोरी आणि देवळाली येथे एबी फॉर्म पाठवले होते. पण इगतपुरी येथील उमेदवार मनसेमध्ये गेल्याने तेथे फॉर्म पाठवला नाही. नाशिकमधे महायुतीतील पक्षांकडून देण्यात आलेल्या दोन-दोन उमेदवारांबाबत अजित दादा आणि सगळी मंडळी बसून चर्चा करतील, असेही भुजबळ यांनी सांगितले.
अनेक मतदारसंघात दोन-दोन उमेदवार देण्याबाबत भुजबळ म्हणाले, केवळ नाशिकच नाही तर इतर अनेक ठिकाणी दोन-दोन उमेदवारंनी फॉर्म भरले आहेत. 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल. बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असतीलच. माघारीच्या दिवसापर्यंत 90 टक्के बंड थंड झालेले असेल. पण जे ऐकणार नाहीत, त्यांच्यासाठीही देखील निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत प्रयत्न सुरू असतील.





