बीड : बीडमधील संभाजी महाराज क्रीडांगणात आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. “ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, असे तुम्ही म्हणता, पण हा डीएनए कधी सरकेल, सांगता येत नाही,” असे सणसणीत प्रत्युत्तर देत भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून सरकारला धारेवर धरले. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. या सभेत धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित होते. “दहा तासात कुणबी प्रमाणपत्र कसे?” भुजबळांचा सवाल भुजबळ यांनी २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरवरून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ३ ऑक्टोबरला सकाळी अर्ज केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी कुणबी प्रमाणपत्र मिळाले. अरे, आम्हाला दहा महिने लागतात, तुमच्या अधिकाऱ्यांना दहा तासात कसे काय जमले? एवढे फास्ट अधिकारी कुठून जन्माला आले?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “मी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले, पण हे थांबवले नाही, तर लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता ओबीसी हा तुमचा डीएनए आहे, पण हा डीएनए कधी सरकेल, काही सांगता येत नाही,” असा इशारा भुजबळ यांनी दिला. “ओबीसीवर अन्याय झाला तर दुधखुळे राहणार नाही” पुढे बोलताना म्हणाले की, “हायकोर्टाने सांगितले की मराठा आणि कुणबी एक जात नाही. सुप्रीम कोर्टानेही मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही जीआर काढून ओबीसी कोट्यावर अतिक्रमण केले जात आहे,” असे भुजबळ म्हणाले. त्यांनी भाजपला उद्देशून सांगितले, “आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर १३५ आमदार मिळाले. पण जर तुम्ही ओबीसीवर अन्याय कराल, तर आम्ही दुधखुळे राहणार नाही. लवकरात लवकर यात मार्ग काढा.” “आम्हाला मूर्ख समजू नका, रस्त्यावर आणि कोर्टात लढू” भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही जोरदार टीका केली. “जरांगे बोलतात, त्यांचे चालते; आम्ही बोललो तर आम्ही जातीवादी. दोन लाख लोक आले, आणखी दोन लाख टाकले तर आमच्या मानगुटीवर बसणार नाही. तुम्ही आम्हाला वेडे समजले का? अख्खे आयुष्य लढण्यात गेले, आम्हाला मूर्ख समजू नका,” असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले. “बंजारा समाजाने एक आवाज दिला, आदिवासी समाज उठला. पण आम्ही गप्प बसायचे आणि मराठा समाजाला बोकांडी बसवून घ्यायचे? कुठला न्याय आहे हा?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी सरकार आणि मराठा आंदोलकांना आव्हान दिले.