छगन भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढणार; नेमकी कोणाची लागणार वर्णी?

Chhagan Bhujbal | नाराजी नाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता पार पडला.
महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ नाराज होते. मात्र आता त्यांना पुन्हा एकदा मंत्री मंडळाची संधी देण्यात आली आहे. मात्र छगन भुजबळ यांच्या मंत्री मंडळातील एन्ट्रीने नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
दादा भुसे आणि गिरीश महाजन नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत
रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि भाजप नेते गिरीश महाजन हे दोघेही दिग्गज नेते नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. मात्र असे असताना छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्याने पालकमंत्री पदाचा ट्विस्ट आणखी वाढला आहे.
शिवसेनेच्या विरोधानंतर निर्णयास स्थगिती
18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिले होते. परंतु शिवसेनेच्या विरोधानंतर त्या निर्णयास स्थगिती देण्यात आली. नाशिकमधील शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दावा केला होता. आता या दाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांची भर पडणार आहे.
भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने नाशिक जिल्ह्याला आता चार मंत्रिपद मिळाले असून 3 राष्ट्रवादी काँग्रेस तर एक शिवसेनाकडे आहे. नाशिक जिल्ह्यातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ आणि छगन भुजबळ हे चौघे कॅबिनेट मंत्री आहेत. मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. दरम्यान, आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Chhagan Bhujbal |
धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद रिक्त होतं. अशातच ही जबाबदारी नेमकी कुणाच्या खांद्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अशातच मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. Chhagan Bhujbal |
भुजबळांची नाराजी दुर
दरम्यान, राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलूनही दाखविली होती. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रीपदासाठी भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा होती.
हेही वाचा:





