Chhagan Bhujbal : ठरलं तर…! छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी

Maharashtra Politic : सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार छगन भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या या खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्रिपदाची जागा गेले काही महिने रिक्त ठेवण्यात आली होती. बुधवारी (ता. २१) भुजबळ यांची या जागेवर वर्णी लावण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.
तसेच मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून ते नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून देखील दाखविली होती. छगन भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात.
अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती.
त्यानंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे.





