Chhaava Movie : ‘छावा’मधील काही डायलॉग्समध्ये बदल; तर ‘त्या’ सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने लगावली कात्री

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ते दृश्य चित्रपटातून हटवण्यात आले आहे. तसेच या चित्रपटामधील काही डायलॉग्समध्ये बदल करण्यात यावे असे सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
सेन्सॉर बोर्डाने सुचवले ‘हे’ बदल
‘छावा’ या चित्रपटातील ‘हरा*****’ शब्दाला म्यूट करण्याची सूचना देण्यात आली आहे.
‘मुघल सल्तनत का जहर’ या डायलॉगला बदलून ‘उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थें’ असं करण्यात आलं आहे.
‘खून तो आखिर मुघलों का ही है’ हा संवाद बदलून ‘खून तो है औरंग का ही’ असं करण्यात आले आहे.
चित्रपटातील एका सीनमध्ये ‘आमीन’ या शब्दाऐवजी ‘जय भवानी’ हा शब्द वापरण्यास सांगितलं आहे.
’16 वर्षे’ बदलून ’14 वर्षे’ असं केलंय
’22 साल का लडका’ बदलून ’24 साल का लडका’ असं केलंय
‘9 साल’ बदलून ‘कई साल’ असं केलंय
तसेच मराठा योद्धांनी साडी नेसल्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे, त्याचं नाव सांगणारा डिस्क्लेमर समाविष्ट करण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. याव्यतिरिक्त डिस्क्लेमरमध्ये हेसुद्धा स्पष्ट करण्याची सूचना दिली आहे की, या चित्रपटाचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याचा किंवा तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा नाही.
‘छावा’ला सेन्सॉर बोर्डाने ‘युए 16+’ची रेटिंग दिली आहे. या चित्रपटाचा रनटाइम 161 मिनिटं आणि 50 सेकंद म्हणजेच जवळपास 2 तास 42 मिनिटं इतका आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.





