पिंपरी | ताजे गावातील चेतन बनला ग्रामविकास अधिकारी

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील ताजे गावातील चेतन दत्ता केदारी याची स्पर्धा परीक्षेतून ग्रामविकास अधिकारी पदी निवड झाली आहे.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत चेतन याने हे संपादन केले आहे. ताजे सारख्या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा अधिकारी झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चेतनची रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे.
चेतनचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे येथे झाले. चेतन कृषी पदवीधर असून डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने बीएस्सी एग्रीकल्चर पदवी प्राप्त केली आहे.
कॉलेजच्या काळात काम करून अभ्यास करत चेतन यशस्वी झाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोन तीनदा त्याला अपयश आले. परंतु यावेळी मात्र चेतनने यश खेचून आणले.
अशी असते परीक्षा
ही परीक्षा ग्रामविकास विभागाकडून आयबीपीएस संस्थेमार्फत घेण्यात आली होती. एकूण २०० गुणांची ही परीक्षा होती. ज्यात मराठी ३० गुण, इंग्लिश ३० गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ३० गुण, बुद्धिमत्ता आणि गणित ३० गुण व तांत्रिक घटक ८० गुण अशी रचना होती.
कुटुंबाची साथ ठरली मोलाची
कृषी पदवी घेणे असो किंवा ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्त होणे असो, चेतनला कुटुंबातील आई-वडील, भाऊ, मामा आणि मित्रपरिवार यांची चांगली साथ आणि मार्गदर्शन लाभले.





