मित्रासाठी मैदानही सोडणारा जिगरी यार

चेतन चौहान यांना क्रिकेट वर्तुळातून आदरांजली
पुणे – सनी तू शतकवीर आहेस मी नाही, असे गमतीने म्हणणाऱ्या चेतन चौहान यांचे हेच शब्द खरे ठरले व वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर विक्रमादित्य व जवळचा मित्र सुनील गावसकर तसेच अन्य क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त करत आदरांजलीही वाहिली.
एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मला यष्टीमागे झेलबाद दिले गेले होते. मी बाद नव्हतो, पण पंचांनी निर्णय दिला होता. त्यावेळी या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी चेतनने विरोध केला नाही. ही घटना त्यावेळी खूप गाजली होती. निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांत अनेकदा आमची भेट झाली. त्यावेळी मित्रा आपण आयुष्याचीही शतकी भागीदारी करू असे मी सांगायचो. अरे बाबा, तू शकतवीर आहेस मी नाही, असे तेव्हा तो गमतीने म्हणायचा, पण त्याचे हेच शब्द खरे ठरले याचे खूप वाईट वाटते. एक अत्यंत दिलदार मित्र गमावल्याचे दुःख आहेच, अशा शब्दात गावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राकडूनही चौहान यांनी क्रिकेट खेळले होते. त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ खेळाडू चंदू बार्डे व पांडुरंग साळगावकर यांनीही चौहान यांना आदरांजली वाहिली आहे. एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असलेला खेळाडू आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही, असे बोर्डे यांनी म्हटले आहे. एक मेहनती व नवोदितांना प्रोत्साहन देणार खेळाडू म्हणून चौहानची ओळख कायम राहील, अशा शब्दात साळगावकर यांनी आदरांजली वाहिली आहे.





