‘Chatron Ki Gunj’: राहूल गांधींच्या कार्यक्रमामुळे मेट्रोत मोठी गर्दी
'Chatron Ki Gunj'

‘Chatron Ki Gunj’: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमामुळे शुक्रवारी मेट्रोमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. एआयएसएसएमएस महाविद्यालयात आयोजित केलेला हा कार्यक्रम वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिकेवरील आरटीओ स्थानकापासून जवळ असल्याने कार्यक्रमाला येणाऱ्या हजारो नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोवर प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेऊन पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून पूर्वतयारी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस प्रशासनाने मेट्रो स्थानकांची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था तसेच प्रवासी हाताळण्याची क्षमता तपासली होती.
पुण्यात मेट्रोचा वापर सातत्याने वाढत असून, दर महिन्याला ६० लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. त्यातच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन मेट्रो मार्गिकेजवळ झाल्यास वाहतूककोंडी टाळण्यासाठी मेट्रो हा नागरिकांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.





