छत्रपती साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि विरोधकांमध्ये मतदार यादीवरून शाब्दिक चकमक

प्रतिनिधी गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्यांवरून छत्रपती साखर कारखान्याचे संचालक मंडळ व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान पोलिसांच्या मदतीने हा गोंधळ थांबविण्यात आला. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकारचे नवीन नियमावलीमध्ये बिगर ऊस उत्पादक सभासद, थकबाकीदार सभासद व अ. प. क. यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. असे असताना देखील कारखान्याच्या प्रशासनाने
या लोकांची मतदार यादीमध्ये मुद्दाम समाविष्ट केली. या मतदान यादीला विरोध दर्शवत साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीच्या वतीने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. व काम बंद केल्याने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना विरोधकांनी बाहेर बोलावले परंतु संचालक मंडळाने पुन्हा कार्यकारी संचालकांना आत बोलावून जो काही प्रश्न असेल तो अंतर्गत कारखान्यांमध्ये मिटवला जाईल अशी भूमिका घेतली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशात वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ थांबवला.
अशा प्रकारची घटना श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यांमध्ये कधीच घडली नाही. मात्र या घटनेमुळे कारखान्याच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे व कर्मचाऱ्यांना बळजबरीने बाहेर काढणे ही घटना योग्य नसल्याने अशाप्रकारे जर घटना घडत राहिल्या तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीमध्ये वाढ होत जाणार आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखाना हा सर्व सभासदांचा असल्याने सभासदांनी या गोष्टीचा विचार करावा. विरोधकांनी जो आरोप केला आहे की चुकीच्या पद्धतीने मतदार याद्या दाखल केल्या आहेत. परंतु हा आरोप पूर्णपणे चुकीचा असून नवीन कायद्यानुसार मतदार याद्या दाखल केलेले आहेत. कारण नसताना कारखान्यावरती विरोधक प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कारखान्याने नवीन कायद्यानुसार मतदार याद्या प्रादेशिक सहसंचालकाकडे दिलेल्या आहेत. यामध्ये कोणत्याही संचालकाने प्रेशर आणलेला नाही. परंतु विनाकारण विरोधक बदनाम करण्याचे काम करत आहेत. असाही आरोप संचालकांनी केला आहे.





