NH-४८ वरील अपघातांवरून चरवड आक्रमक; उपोषणाचा दिला इशारा

धायरी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग NH-४८ नवले ब्रिज हायवे, सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि सततची अपघातांची मालिका यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे. यावर दीर्घकालीन उपयोजना होत नाहीत, म्हणून संतप्त भाजप पुणे शहर उपाध्यक्ष आणि नगरसेवक हरिदास चरवड यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
NHAI चे अधिकारी, पुणे मनपा अधिकारी , PMRDA अधिकारी, स्थानिक खासदार, स्थानिक आमदार, पुणे शहराचे महापौर, स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी असे निवेदन दिले आहे. मात्र संबधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चरवड यांनी सांगितले.
चरवड म्हणाले की, वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून NH-4८ रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई – बैगलोर असा आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी सदर हायवे, सर्व्हिस रस्ता, नवले पूल, कात्रज रोड, नऱ्हे, हायवे लगत वीरबाजी पासलकर चौक येथे झालेले आहेत. गेल्या दोन महिन्यात या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.
वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही सदर बाबतीत काहीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही. यावरून प्रशासनाचा याचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनात येत आहे. म्हणूनच प्रशासनाच्या निषेधार्थ आणि नागरिकांच्या हक्कासाठी आता आम्हाला उपोषणाचा करण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असं चरवड यांनी म्हटले आहे.





