पुणे | गुणवंत विद्यार्थ्यांना सारथीचा आधार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला- मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक साह्य देण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. मात्र, खोटी माहिती व कागदपत्रे सादर केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही करण्यात येणार आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला- मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ५० व २५ याप्रमाणे एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
पहिल्या टप्प्यात २१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. योजनेची कार्यपद्धती व निवड प्रक्रियेनुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या दुसरया टप्प्यासाठी सारथी संस्थेमार्फत जाहिरात देऊन ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. सारथी संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून समितीने पात्रतेच्या अटी, शर्ती तपासून विद्यार्थ्यांची यादी समितीच्या शिफारशीसह निवड समितीपुढे सादर केली. समितीने ३० विद्यार्थ्यांची शिफारस केली होती.
निवड समितीच्या बैठकीत त्यामधील एका विद्यार्थ्यास यापूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती मंजूर केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला वगळण्यात आले. पात्र ठरलेल्या उर्वरित २१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही शिष्यवृत्ती गृह चौकशीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आली असून, चौकशीमध्ये विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करताना चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास शिष्यवृत्ती रद्द होणार आहे. तसेच ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव करून त्याच्याकडून झालेल्या खर्चाची १५ टक्के चक्रवाढ व्याजाने वसुलीही करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शिष्यवृत्तीच्या रकमेची अचूक परिगणना करण्याची जबाबदारी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सोपविण्यात आली आहे.





