आणखी 294 परदेशी तबलिगींच्या विरोधात आरोपपत्रं दाखल
Updated On:

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी बुधवारी आणखी 294 परदेशी तबलिगी सदस्यांविरोधात 15 आरोपपत्रं दाखल केली. करोना फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन आणि व्हिसा नियमांचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. याआधी मंगळवारी त्याच आरोपांवरून 82 परदेशी तबलिगी सदस्यांविरोधात येथील न्यायालयात 20 आरोपपत्रं दाखल करण्यात आली होती.
त्यामुळे 34 देशांमधील एकूण 376 परदेशी तबलिगींविरोधात आतापर्यंत 35 आरोपपत्रं दाखल झाली आहेत. दिल्लीत मार्च महिन्यात तबलिगी जमातचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात परदेशी नागरिकांसह सुमारे 9 हजार सदस्य हजर राहिले. त्यांच्यातील अनेकांना करोनाची लागण झाल्याने भारतातील बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली. त्यामुळे वादग्रस्त ठरलेला तो मेळावा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आला.





