इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीत चार्जरचा झटका; चौदा हजार रुपये किंमत

हर्षद कटारिया
बिबवेवाडी – पर्यावरण पूरक म्हणून शासनाकडून इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु, चांगल्या कंपनीची लाखांत रक्कम देऊन खरेदी केलेली दुचाकी ग्राहकांना नविन पध्द्तीच्या नाजूक चार्जरमुळे मोठ्या अर्थिक झटक्यास कारणीभूत ठरत आहे. शहरात पर्यावरण पूरक तसेच वाढत्या पेट्रोल इंधनावर इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. आता, अनेक ठिकाणी अशा वाहनांची चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली असल्यचेही दिसते.
मात्र, नामांकित घोडेस्वार कंपनीची दिड लाख रुपये देऊन घेतलेली दुचाकी ग्राहकांना अर्थिक झटका देत आहे. या दुचाकीचा नवीन पध्द्तीचा लॉकिंग चार्जर अतिशय नाजूक आहे, चार्जर हाताळताना त्याची आतील पिन वाकली जात असल्याने तो लगेचच खराब होत आहे. विशेष म्हणजे हा चार्जर तब्बल १४ हजार रूपयांना मिळत असल्याने एक-दोन वेळा हा चार्जर तुटला तर २८ हजार किंवा त्यापेक्षाही जास्तवेळा फटका बसत आहे.
काही इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जर चांगले आहेत तर बहुतांशी कंपन्या तकलादू चार्जर देत असल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, नविन चार्जर हाताळणे व जास्त दर बाबत ग्राहकाच्या तक्रारीला अनुसरून कंपनीस माहिती दिली असता सध्या सर्वच कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जरचे दर जास्त आहेत. ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये संपर्क साधून इन्शुरन्स किंवा ऑरंटी मध्ये नवीन चार्जर मिळणे बाबत माहिती घ्या, असे सांगण्यात येत आहे.
विक्रीसाठी कंपन्यांचा फंडा…
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती साधारण एक लाखाच्या पुढे आहेत. मात्र , काही कंपन्या लॉकिंग चार्जर अतिशय नाजूक देत आहेत. यातील पिना अतिशय नाजूक आहेत, त्या खराब झाल्यास कोणतीही दुरुस्ती होत नाही, चार्जर हाताळताना खराब झाल्यास नवीन घेण्यास १४ हजार रुपये खर्च आहे. अशा चार्जरची विक्री वाढविण्यासाठी कंपन्यांचा हा फंडा ठेवला आहे की काय, अशी शंका आता ग्राहक उपस्तित करू लागले आहेत.





