फारूख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल

श्रीनगर – जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारातील कथित मनी लॉंडरींग प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
84 वर्षीय फारूख यांची याच प्रकरणात अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अनेकवेळा चौकशी करण्यात आली होती. मे महिन्यातही श्रीनगर येथे त्यांची तीन तास चौकशी झाली होती. डिसेंबर 2020 मध्ये ईडीने फारूख अब्दुल्ला यांची 11.86 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित निधी संस्थेचे पदाधिकारी आणि अन्य काही व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 11 जुलै 2018 रोजी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल झालेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. फारूख अब्दुल्ला यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या रकमेची लूट केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
‘या’ पाच गोष्टी फक्त 5G नेटवर्कवर शक्य आहेत; जाणून घ्या
दरम्यान, केंद्रीय तपास संस्थांचे विरोधी पक्षांच्या नेत्यांना येणारे समन्स ही सामान्य बाब आहे. विधानसभा निवडणुका येईपर्यंत या संस्था विरोधी पक्षांच्या नेत्यांना असाच त्रास देत राहतील अशी प्रतिक्रिया फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.





