नोबेल विजेत्या मोहम्मद युनुस यांच्यावर आरोपपत्र; अन्य १३ जणांविरोधात देखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप

ढाका – ढाका न्यायालयाने बुधवारी नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर मुहम्मद युनूस आणि अन्य १३ जणांवर एका दूरसंचार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लाभांशातून दोन दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप लावला.
आरोप रद्द करण्याची मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयाने फेटाळून लावली आणि या सर्वांवर आरोपपत्र ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. मोहम्मद युनुस आणि इतरांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. या सर्वांच्या उपस्थितीत त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवण्यात आले.
डॉ. युनुस आणि अन्य १३ जण सध्या जामिनावर आहेत. या सर्वांनी आपला गुन्हा अमान्य केला आहे. मात्र आरोप रद्द करण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप प्राथमिक पातळीवर सिद्ध झाले असून त्यामुळेच त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले असल्याचे सांगितले.
युनूस यांना २००६ मध्ये गरीब लोकांना, विशेषतः महिलांना मदत करण्यासाठी सुक्ष्म पतपुरवठ्याची योजना राबवल्याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले होते, तर त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेलाही त्याच प्रसंगी पारितोषिक मिळाले होते.
युनूस यांच्यावर इतर १५० हून अधिक खटले आहेत. त्यात मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समावेश आहे. त्यात दोषी आढळल्यास त्यांना अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो,
काय आहे प्रकरण…
युनूस आणि इतरांवर ग्रामीण टेलिकॉमच्या कामगार कल्याण निधीतून २५० दशलक्ष टका (२ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त) इतकी रक्कम लाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बांगलादेशातील सर्वात मोठी मोबाइल फोन ऑपरेटर कंपनी ग्रामीण टेलिकॉमही ग्रामीणफोन या नॉर्वेच्या टेलिनॉरच्या दूरसंचार कंपनीची उपकंपनी असून या कंपनीमध्ये ग्रामीण टेलिकॉमचा ३४.२ टक्के हिस्सा आहे.





