Taiwan : तैवानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधकातील तणाव शिगेला; जोरदार हाणामारीत 5 खासदार जखमी, जाणून घ्या ‘नेमकं’ काय घडलं….

Taiwan : तैवानच्या संसदेत शुक्रवारी वादग्रस्त विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमधील तणाव शिगेला पोहोचल्याने अराजकता माजली. संसदेत दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली, खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आणि व्यासपीठावर उड्या मारून कामकाजात व्यत्यय आणला आणि काही खासदारांनी तर फाईली(Files) हिसकावून सभागृहाबाहेर नेल्या.
हाणामारीत जखमी झाल्यामुळे पाच खासदारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (DPP) आणि कुओमिंतांग (KMT) या दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांचा समावेश होता. संपूर्ण सत्रात क्रॉस-कॉकस वाटाघाटी खोळंबल्याने हा गोंधळ आणखी वाढला. डीपीपी खासदार आणि विरोधी केएमटी आणि टीपीपी पक्षाच्या खासदारांमध्ये अनेक तास हाणामारी झाली.
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष ‘लाइ चिंग ते’ सोमवारी, 20 मे रोजी शपथ घेणार होते. तैवानच्या संसदेत एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना अधिक अधिकार मिळणार आहेत. याशिवाय, संसदेत खोटी विधाने केल्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. या विधेयकावर मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली.
Ruling and opposition lawmakers engaged in physical scuffles and verbal attacks over several controversial bills on Friday, including amendments that would give the Legislature additional powers. #KMT #DPPhttps://t.co/N5jGpCnddd pic.twitter.com/0AgPt6MT6J
— Focus Taiwan (CNA English News) (@Focus_Taiwan) May 17, 2024
विरोधी पक्ष केएमटीला बहुमत असल्यामुळे संसदेत आपल्या सदस्यांना अधिक शक्तीशाली करायचे आहे. त्याचवेळी, लाई यांच्या पक्ष डीपीपीचा आरोप आहे की, विरोधी सदस्य हे विधेयक संसदेत जबरदस्तीने मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे संविधानाचे उल्लंघन आहे.
संसदेत गमावले बहुमत…
नवीन सरकारची स्थापना आधीच वादात आहे, कारण जानेवारीमध्ये निवडणुका जिंकूनही लाईच्या डीपीपीने संसदेत आपले बहुमत गमावले आहे. विरोधी केएमटी KMT कडे डीपीपी DPP पेक्षा जास्त जागा आहेत, पण बहुमतासाठी पुरेशा नाहीत.
डीपीपीवर मोठा आरोप…
केएमटी पक्षाच्या सदस्या जेसिका चेन यांनी डीपीपीवर पक्ष म्हणून निरंकुश शक्ती मिळविण्याचा आरोप केला. त्यांनी सत्ताधारी पक्षावर इतरही अनेक आरोप केले.





