Rakhi: राख्यांचा बदलता ट्रेंड; परंपरेपासून पर्यावरणपूरकता कडे वाढता कल

Rakhi: रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर म्हणजे ९ ऑगस्ट रोजी येऊन ठेपला आहे. भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्यांचा बाजार यंदाही गजबजला आहे. मात्र यंदाच्या राख्यांमध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परंपरेचा सन्मान राखत, आता पर्यावरणपूरक राख्यांनाही पसंती मिळू लागली आहे.
परंपरागत राख्यांपासून फॅन्सी राख्यांपर्यंत
बाजारपेठांमध्ये आजही झरी, कुंदन, मोती आणि रेशीम धाग्यांनी सजलेल्या पारंपरिक राख्यांना मागणी आहे. मात्र याचबरोबर कार्टून राख्या, स्टोनवर्क राख्या, आणि लाइट-अप (एलईडी) राख्या लहान मुलांना आकर्षित करत आहेत. प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी ‘खास’ राखी शोधत असल्याने दुकानदारांकडे डिझाइन्सची मोठी रेंज दिसून येते.
वैयक्तिक स्पर्श असलेल्या राख्यांची वाढती मागणी
आजच्या डिजिटल युगात पर्सनलाइज्ड राख्या लोकप्रिय ठरत आहेत. भावाच्या नावाने, फोटोसह, किंवा खास संदेश असलेल्या राख्यांना तरुण वर्गाचा अधिक प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच DIY (Do-It-Yourself) राखी किट्समुळे मुली स्वतः राखी बनवून एक वेगळा अनुभव घेत आहेत.
‘ग्रीन राखी’,पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या राख्या
यंदा राख्यांमध्ये मोठा बदल म्हणजे प्लांटेबल राख्यांची वाढती लोकप्रियता आहे. या राख्यांमध्ये झाडांच्या बिया असतात. राखी बांधल्यानंतर ती जमिनीत लावता येते आणि त्यातून झाड उगवतं. ह्या राख्या नैसर्गिक धाग्यांपासून बनवल्या जातात, त्यामुळे प्लास्टिकचा वापरही टाळला जातो.
ऑनलाइन राख्यांचा ट्रेंडही वाढला आहे
बाजारात खरेदीसाठी गर्दी असली तरी अनेकजण ऑनलाइन माध्यमांतून राख्या मागवतात. विविध ई-कॉमर्स साईट्सवर राखी नावासहित आणि गिफ्ट कॉम्बोजसह उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या बहिणी भावांपासून दूर राहतात, त्यांच्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतोय.
राखी म्हणजे नुसतं एक सजावटीचं वस्त्र नाही, तर भावंडांच्या नात्याला सशक्त करणारा एक भावनिक दुवा आहे. प्रत्येक राखी मागे असते आठवण, प्रेम आणि विश्वासाची एक सुंदर कहाणी.





