Pune मतपेट्या वाहतुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आणि बुधवारी (२० नोव्हेंबर) बदल करण्यात येणार आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील मतदान केंद्रांतून मतपेट्या, तसेच अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने हा बदल करण्यात येणार आहे.
त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरू स्टेडियम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी आणि बुधवारी बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बुधवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
मतदान साहित्य श्री गणेश कला क्रींडा रंगमच येथील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार असल्यामुळे सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.





