पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे – गणेशोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याचा परिणाम मध्यवर्ती पेठांतील वाहतुकीवर होत असून, वाहतूक संथ होते. वाहतूक सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने 19 सप्टेंबरपर्यंत शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर सर्व बसेस आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
गणपतीची शुक्रवारी (10 सप्टेंबर) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानंतर मानाचे पाच आणि प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. याशिवाय, उत्सवाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची मध्यवर्ती भागातील गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल केले आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना या बदलाचे पालन करणे बंधनकारक असेल.
या मार्गांवर होणार बदल
शिवाजी रस्ता
शिवाजी रोडमार्गे स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रोडने जावे.
स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशीची राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून वाहने बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.
बाजीराव रस्ता
पूरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक आणि पुढे एफसी रोडने इच्छितस्थळी जावे.
शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी पूर्ण वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करून मंडईत जाणाऱ्या वाहन चालकांनी आपले वाहन पार्क करून चालत मंडईकडे जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आपले वाहन पार्क करून चालत बुधवार चौकाकडे जावे.





