पुण्यात श्री गणेशासोबत यंदा ‘चांद्रयानोत्सव’

घरोघरी अवतरल्या रॉकेट, लॅंडर, रोव्हरच्या प्रतिकृती;
“इस्रो’ च्या संशोधकांनी मिळवलेल्या यशाचे सेलिब्रेशन
पुणे – गणपतीत देखाव्यांची रेलचेल असतेच. आजपर्यंत सार्वजनिक गणपती मंडळांचे देखावे प्रसिद्ध होते. त्या आधी केवळ म्युझिकवर चालणारे लायटिंग असायचे. पण नंतर विषय ठरवून देखावे उभारण्याला सुरूवात झाली. मात्र, आता घरोघरीही छोटे-छोटे देखावे अनेकजण करताना दिसत आहेत. यंदा या घरगुती गणपतींमध्ये सर्वाधिक देखावे हे चांद्रयानाचे असल्याचे दिसून येत आहे.
घरातील आबालवृद्धांच्या “क्रिएटिव्हिटी’ला चालना देण्यासाठी एक “थीम’ घेऊन दरवर्षी छोटेखानी देखावा करताना हल्ली दिसतात. त्यातून सोशल मीडियामुळे या “क्रिएटिव्हिटी’ला अधिकच भर आला आहे. येथे नवनवीन आयडियाज तर मिळतातच परंतु आपण देखावे तयार करून याच सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या “क्रिएटिव्हिटी’ला “लाइक’, “शेअर’ आणि “कमेंट्स’ मिळतात. त्यामुळे एकप्रकारे हुरूपही येतो.
यंदा चांद्रयान बनवण्यासाठी अनेकांनी लढवलेली शक्कल खरेच कौतुक करण्याजोगी आहे. कागदाच्या नळ्या बनवून त्याला टोक लावून, बनवलेले रॉकेट. मागे पडदा लावून तयार केलेले अंतराळ, त्यात ग्रह तारे, चंद्रावर पोहोचलेले चांद्रयान त्यातून बाहेर पडलेले “प्रग्यान रोव्हर’ आणि “विक्रम लॅंडर’ या सगळ्यांच्या प्रतिकृती पुठ्ठ्यावर रंगीत, चमकणारे घोटीव कागद लावून बनवण्यात आले आहेत.
याशिवाय काहींनी शक्कल लढवून हे यान वर जाताना दाखवले आहे. त्याला दोरी बांधून मागील बाजूने ते ओढल्यास यान वर जाताना दिसते, अशी संकल्पना आहे. ढगांच्या “फील’साठी कापसाचा वापरही काही जणांनी केला आहे.





