चांद्रयानच्या रोव्हरने पाठवली चंद्रावरील आश्चर्यकारक माहिती

बेंगळुरू – चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीपणे उतरलेल्या विक्रम लॅंडरमधील “प्रज्ञान’ रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आपला प्रवास करत आहे. या प्रवासादरम्यान त्याला मिळालेली माहिती तो इस्रोला पाठवित आहे. दरम्यान, आज इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, “प्रज्ञान’च्या वाटेत चार मीटरचा खड्डा आल्याने त्याला वाट बदलावी लागली. सध्या प्रज्ञान सुस्थित असून, नवनवीन माहिती देत आहे.
23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वी लॅंडिग करणाऱ्या विक्रम लॅंडरमधील प्रज्ञान नावाचे रोव्हर चंद्रावर रोज काही मीटर चालत असून, त्या दरम्यान त्याला नवनवीन माहिती मिळत आहे. त्यातच 27 ऑगस्ट रोजी रोव्हरने सुरू केलेल्या प्रवासात तीन मीटर पुढे गेल्यानंतर या रोव्हरला चार मीटर व्यासाचा एक खड्डा लागला. यानंतर रोव्हरला परत फिरण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर रोव्हरने त्याची वाट बदलून पुन्हा सुरक्षितपणे आपला प्रवास सुरू केला आहे.
विक्रम लॅंडरवर लावण्यात आलेल्या चेत्स्टे पेलोडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागावर 50 सेल्सीअसपर्यंत तापमान आहे. आणखी खोलवर गेल्यानंतर या तापमानामध्ये कमी होते. तर मिळालेल्या माहितीच्या आधारे 80 मिली मीटरपर्यंत आत गेल्यानंतर तापमान हे केवळ 10 सेल्सीअसपर्यंत जाते. एकुणच चंद्राचा पृष्ठभाग हा तापमान टिकून ठेवण्यास असक्षम ठरत असल्याचे दिसून येते, अशी माहिती रोव्हरने दिली होती.
मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सुरू
इस्रोने सांगितले की, पेलोडमध्ये तापमान मोजण्याचे साधन आहे, जे पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. हा आलेख चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा वेगवेगळ्या खोलीतील पृष्ठभागाच्या तपमानातील फरक दाखवतो, जसे की तपासादरम्यान नोंदवले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अशी ही पहिलीच माहिती आहे. त्याचा सविस्तर अभ्यास आणि विश्लेषण करण्यात येत आहे. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये असे दाखवले आहे की चॅत्स्टे पेलोड जसजसे खोलीकडे सरकत आहे, तसतसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात चढ-उतार दिसत आहे.





