Chandrashekhar Bawankule : शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवरून बावनकुळेंनी पडळकर आणि खोत यांना झापले

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थरावर जाऊन टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात पवार यांच्यावर टीका न करण्याची भूमिका घेतलेल्या भाजपने सत्ता येताच पुन्हा पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. या नेत्यांना शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
शरद पवार हे अतिशय मोठे नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. शरद पवार यांनी एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यांच्यासारखेच इतरही पक्षातील मान्यवर नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. अशा नेत्यांवर बोलताना तार्तम्य ठेवले पाहिजे. अशा प्रकारची विधाने पक्षाला मान्य नाहीत. येथून पुढे अशी विधाने होणार नाहीत, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
पडळकर आणि खोत काय म्हणाले होते?
१०० शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतात, अशी अश्लाघ्य टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. तर सदाभाऊ खोत यांनी गावगाड्याची भाषा म्हणत पवार यांना एकेरी भाषेत संबोधले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.





