Chandrashekhar Bawankule: पुणे आणि पिंपरीत भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने! बावनकुळेंनी सांगितले वेगळे लढण्याचे कारण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे अधिक काम आहे. तेथे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते खूप वर्षे काम करीत असल्याने सर्वांना लढण्याची संधी मिळावी म्हणूनच आम्ही वेगळे लढत आहोत, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिले. महायुतीच्या पक्षांमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ, असा शब्दही बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृतज्ञता समारंभानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप-सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढतील, यांसह इतर राजकीय विषयांवर सविस्तर भाष्य केले. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि प. महाराष्ट्रातील काही महापालिकावगळता मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रच महापालिकेच्या निवडणुका लढवतील, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
महापालिकेच्या स्थानिक स्तरावरील निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणे शक्य होणार नाही. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठराविक महापालिकांमध्ये वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून राज्यातील महायुतीला कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले, तरीही यामुळे भविष्यात महाविकास आघाडीतील कोणालाही राज्यातील महायुतीच्या सत्तेत वाटेकरी होता येणार नाही, असेही त्यांनी ठळकपणे सांगितले.
सरकार कोणालाही वाचविणार नाही
कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार कोणालाही वाचवणार नाही, याचा पुनरूच्चार बावनकुळे यांनी केला. तसेच पोलिसांनी सक्षम पुरावे न्यायालयात सादर केल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू असून, खारगे समितीची या प्रकरणात स्वतंत्र चौकशी सुरू आहे. संपूर्ण प्रकरणातील दोषींवर सरकार निश्चित कारवाई करेल, असेही त्यांनी नमूद केले.





