मला भीती वाटली.! आता कायद्यानेच उत्तर देणार; चंद्रकांत पाटलांबद्दल गौतमी पाटील स्पष्टच बोलली

पुणे : पुण्यातील नवले पूलावर ३० सप्टेंबरला झालेल्या अपघातप्रकरणात नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या संकटात सापडली आहे. तिच्या मालकीच्या कारने रिक्षाला धडक देण्यामुळे रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला. अपघातादरम्यान गौतमी कारमध्ये नव्हती, तरीही तिच्या नावावर नोंदणीकृत असल्याने तिला नोटीस बजावण्यात आली.
या प्रकरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हायरल व्हिडिओ आणि वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला असून, गौतमीने आज (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ढसाढसा रडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. “मला ट्रोल केलं गेलं, विनाकारण बदनामी होतेय. चंद्रकांतदादांनी ‘उचलायचं की नाही?’ असं म्हणून मला भीती वाटली,” असं म्हणत तिने भावुक होत कायद्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा इरादा व्यक्त केला.
‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
३० सप्टेंबरला पहाटे साडेपाच वाजता पुणे शहरातील वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पूलाजवळ गौतमीच्या कारने एका रिक्षाला मागून धडक दिली. हा अपघातप्रवण भाग असल्याने नेहमीच चर्चेत असतो. रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (वय ५५) यांना गंभीर दुखापत झाली असून, ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघातवेळी गौतमी कारमध्ये नव्हती; तिचा ड्रायव्हर कार चालवत होता. पोलिसांनी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला असून, गौतमीची कार जप्त केली आहे. अपघातानंतर क्रेन बोलावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून, विशेष पोलिस अधिकारी नेमले गेले आहेत. रिक्षाचालकाच्या कुटुंबाने गौतमीला अटक करण्याची आणि भरपाईची मागणी केली असून, ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदतीसाठी गेले होते.
गौतमीची भावूक पत्रकार परिषद
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गौतमीने डोळ्यात अश्रू घेऊन सांगितले, ही गाडी फक्त माझी होती. मी अपघातवेळी माझ्या खासगी कामासाठी दुसरीकडे होते. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पाच दिवसांपासून मला ट्रोल केलं जातंय, मानसिक छळ होतोय. ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, पण अशा प्रकारे प्रतिमा मलीन करणं चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली.
तिने सांगितलं की, अपघातानंतर तिचा “मानलेला भाऊ” रिक्षाचालकाच्या कुटुंबाशी भेटायला गेला आणि मदतचा हात पुढे केला. मात्र, कुटुंबाने “कायद्यानुसार जाऊ” म्हणून मदत नाकारली. “आता मी त्यांच्याशी संपर्कात नाही. त्यांनी मीडियात माझी बदनामी केली, त्यामुळे इथून पुढे कायद्यानुसारच उत्तर देईन,” असं तिने ठामपणे सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर गौतमीची प्रतिक्रिया
या प्रकरणातील सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन. व्हायरल व्हिडिओमध्ये ते म्हणताना ऐकू येतं, “त्यांना उचलायचं की नाही? गौतमीला अटक करायची का?” यावर गौतमीने रडत रडत सांगितलं, “दादांनी अशी भाषा वापरली, मला वाईट वाटलं. मी त्यांना काही बोलू इच्छित नाही. मी गाडीत नव्हते, फक्त गाडी माझी आहे एवढाच संबंध. माझी प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे भीती वाटते. मी काही केलं नाही, तर घाबरू कशाला? आता सगळं कायद्यानुसार करणार.” तिने ट्रोलर्सवरही हल्ला चढवला: “पहिल्या दिवसापासून रोज नव्याने ट्रोल होतेय, याचा प्रचंड त्रास होतोय.”
बदनामी करणाऱ्यांना कायद्याने उत्तर
गौतमीचे वकील ॲड. हेमंत भांड पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, या प्रकरणात गौतमीला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. कुटुंब असो वा राजकारणी, ज्यांनी बदनामी केली त्यांना कायद्यानुसार उत्तर देऊ.” पोलिस गौतमीला तिचं जबाब नोंदवण्यासाठी बोलावू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.





