पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सतत होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनांमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली असून, त्याचाच परिणाम म्हणून एनआयआरएफ रँकिंग घसरले आहे, या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे नवा वाद पेटला आहे. पाटील यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद विद्यार्थी संघटनांसह त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांत उमटले असून, पाटील यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात बोलताना मंत्री पाटील यांनी विद्यापीठाच्या घसरलेल्या राष्ट्रीय मूल्यांकनाचे खापर थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर फोडले. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्य सरकारची खासगी विद्यापीठांना पूरक ठरणारी धोरणे आणि विद्यापीठ प्रशासनाचा अकार्यक्षम कारभार यामुळेच विद्यापीठाची रँकिंग घसरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी विद्यार्थ्यांवर दोष ढकलण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये १५ वर्षे काम केलेले त्यांचे जुने सहकारी धनंजय कुलकर्णी यांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या विद्यार्थी चळवळीच्या शिडीचा वापर करून पाटील राजकीय यशाच्या शिखरावर पोहोचले, त्याच शिडीला त्यांनी लाथ मारली आहे. प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्याच शिष्याने असे विधान करणे हा केळकरांचा अवमान आहे, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी पाटील यांना घरचा आहेर दिला. दरम्यान, युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव, युक्रांदचे कमलाकर शेटे आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनीही प्रशासनाच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठीच मंत्र्यांनी हे विधान केल्याचा आरोप केला. आंदोलनांमुळेच विद्यापीठातील अनेक प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे आंदोलनांना बदनाम करण्यापेक्षा सरकारने आणि प्रशासनाने आपल्या चुका सुधाराव्यात; अन्यथा विद्यापीठाचे स्थान आणखी खाली जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.