Chandrakant Patil : विकसित भारतासाठी कुशल मनुष्यबळ गरजेचं ; ‘शिका आणि कमवा’ योजनेला तळागाळात पोहोचवणार – चंद्रकांत पाटील

प्रभात वृत्तसेवा
पुणे – केवळ पदव्या देऊन सुशिक्षित बेरोजगारांची फौज नव्हे, तर शिक्षणाद्वारे कौशल्ययुक्त तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिका आणि कमवा’योजनेस सामाजिक चळवळीचे स्वरूप द्यावे लागेल, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.कुशल मनुष्यबळ ही विकसित भारतासाठी महत्त्वाची गरज असून, त्यादृष्टीने अप्रेंटिसशिप सुधारणा अधिनियम:परिणाम आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर यशस्वी ग्रुपच्या वतीने वैचारिक मंथन परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्या वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे आणि यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी उपस्थित होते.तरडे म्हणाले, की, शिका आणि कमवा ही योजना ग्रामीण भागातील बांधाबांधापर्यंत पोहोचवणार आहे. या योजनेची काटेकोर अंमल बजावणी करीत कौशल्याधारीत युवकांची फौज निर्माण करण्यासाठी आपल्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. या वेळी भारत फोर्जचे डॉ. संतोष भावे, कायदे सल्लागार ऍड. आदित्य जोशी आणि डॉ. नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.





