Chandrakant Khaire : उद्धवजी संकटात असताना एकत्र काम करावेच लागेल; चंद्रकांत खैरेंची रोकठोक भूमिका

छ. संभाजीनगर : मेळाव्याला मी दांडी मारली हे म्हणणे अतिउत्साहांचे आहे. माझा २ महिन्यांपासून ठरलेल्या कार्यक्रमासाठी नागपूरला गेलो होतो. मला पक्षाच्या कालच्या मेळाव्याबाबत कुणीही सांगितलं नाही. मला देखील कार्यकर्त्यांसोबत बोलायचे होते. मात्र, मी नसताना दानवेंनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नाहीच, पण पत्रिकेत माझे नाव पण नव्हते. मला डावलून कसे चालेल? उद्धवजी संकटात असताना एकत्र काम करावेच लागेल, कुणी पक्षात गटबाजी करत असेल, तर ते मला मान्य नाही, अशी रोखठोक भूमिका चंद्रकांत खैरे यांनी मांडली.
छ. संभाजीनगरमध्ये उद्धवसेने सुरु असलेली धुसफूस अद्यापही कायम आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात चांगलेच शितयुद्ध रंगले असून खैरे यांच्याकडून वारंवार एकत्र मिळून काम करण्याचे आवाहन केले जात आहे. उद्धवसेनेचा नुकताच मेळावा घेण्यात आला. यावेळी खैरे यांनी दांडी मारली, असा आरोप देखील करण्यात आला. त्यामुळे पत्रकार परिषद घेवून खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मरेन पण पक्ष सोडणार नाही. काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे-कुठे जातात, कोण कसे एडजस्टमेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यांना फोन करतो. पक्ष मोठा करायचा सोडून दिले आणि गटबाजीला सुरूवात केली. मी अजूनही पक्षाचंच काम करतो. अनेक लोक सोडून चालले आहेत, ते बरं नाही, असे ही चंद्रकांत खैरे म्हणाले.
दानवेंवर पुन्हा निशाना
दानवेंनी मला सांगितलं नाही. मात्र मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे आणि त्यांच्याकडे तक्रार देखील करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटली, या माणसाने पक्षासाठी काय केलं सांगा? असा सवाल विचारताना खैरे यांनी पुन्हा दानवेंवर टीका केली.




