पिंपरी | ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात चंदनउटी सोहळा

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या लोक सहभागातून अक्षय तृतीयेनिमित्त रुद्रयाग,चंदनउटी, भंडारा आदी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी श्रींची महापूजा व अभिषेक चार्टड आकांटंट स्वानंद आगाशे यांच्या हस्ते झाली.
श्रींची चंदनउटी तळेगाव दाभाडे येथील मूर्तीकार योगेश कार्लेकर व रविंद्र पानसरे यांनी केसरचंदन लेप लाऊन आकर्षक सजावट केली. त्यानंतर रुद्रयाग शुभम गुरव यांनी सपत्नीक केला. दुपारी श्री डोळसनाथ महाराज महिला भजनी मंडळाचे भजन व हरिपाठ झाला. कालभैरवाष्टक पठण, जप व हभप तुषार महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. सायंकाळी दीपमाळ प्रज्वलन करण्यात आली. नंतर श्रींची आरती ढोल, झांज, घंटा, डमरूच्या नादावर होऊन आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्याची सांगता उत्साहाने झाली
या वेळी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई व मंडप व्यवस्था श्री डोळसनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती. नियोजन डोळसनाथ तालीम मंडळ, उत्सव समिती, भजनी मंडळे व सर्व भाविक, ग्रामस्थांनी केले होते.





