पावसाबद्दल निराश करणारी बातमी…जोर ओसरण्याची शक्यता

पुणे- पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर येत्या काही दिवसांत ओसरणार आहे. मात्र, येता आठवडाभर शहरात ढगाळ वातावरण आणि गारवा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस दि. 26 ऑगस्टपर्यत कायम राहणार आहे. तर, राज्यातील उर्वरित भागात तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
अरबी समुद्र आणि आसपासच्या भागात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तसेच मध्य प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात कमी दाबाचा पट्टयाची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद हवामान विभागातर्फे घेण्यात आली आहे. एक जूनपासून 22 ऑगस्टपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत 575.2 मिमी, लोहगाव येथे 610.4 मिमी तर पाषाण येथे 526.3 मिमीची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे.





