‘माध्यमांपुढे सोशल मीडियाचे आव्हान’ – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

कोपरगाव – प्रिंट मीडियाचे महत्व कमी झाले, इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडत चालले आहे तर सोशल मीडियाने आपला ताबा या प्रसार माध्यमावर मिळवलेला आहे. ही आव्हाने माध्यमांना पेलावी लागणार आहे. याबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीतून दर्जा उंचावावा. राजकारण आणि प्रसार माध्यमे हे एकाच नावेत बसले असून, त्यांनी आपले दायित्व वेळीच ओळखले पाहिजे. स्वतःमध्ये बदल केले नाही तर आपणास त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चिंता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे. पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण यादव, अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विखे म्हणाले, पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये बरीच तफावत असून, पूर्वी वेगवेगळे विषयावर लिखाण काम होत असे. आता परिस्थिती बदलत चालली आहे. फेक नेरेटिव्हचे प्रस्थ वाढत चालले आहे. पूर्वी राज्यकर्ते घोषणा ठरवत होते. आता यामध्ये माध्यमाचा सहभाग वाढला असून आता माध्यमे ठरवत असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांचे घर, लग्न, शिक्षण जीवघेणी स्पर्धा यामुळे पत्रकार कात्रीत सापडलेला असून, आयोगाने ठराव करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य येईल. नवी मुंबई आणि ठाणे येथे आपण पत्रकारांच्या जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.





