Chakan News : कोंडीमुक्त चाकणसाठी पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा ; आजी-माजी खासदारांची एकत्र उपस्थिती

प्रभात वृत्तसेवा
चाकण – चाकण औद्योगिक परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि वाढत्या पायाभूत सुविधांच्या समस्यांबाबत वर्षानुवर्षे होत असलेली दिरंगाई पाहता अखेर चाकणच्या नागरिकांनी आणि उद्योग क्षेत्राने ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. आज या समितीने थेट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयावर मोर्चा काढत कोंडीमुक्त चाकणची मागणी जोरदारपणे मांडली.या मोर्चाचे विशेष आकर्षण म्हणजे, राजकीय विरोधक मानले जाणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही एकाच मंचावर एकत्र दिसले.
या दोन्ही नेत्यांनी मोर्चाचे नेतृत्व करत प्रशासनाकडे चाकणवासीयांच्या मागण्या पोहोचविल्या. सोबत खेडचे आमदार बाबाजी काळेदेखील सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले.मोर्चा पीएमआरडीए कार्यालयावर पोहोचताच आंदोलकांनी महानगर आयुक्तांना खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी कार्यालयात प्रवेशास मज्जाव केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे हे रस्त्यावरच बसले आणि पोलिसांशी शाब्दिक चकमक झाल्याचेही साक्षीदारांनी सांगितले. अखेर शिष्टमंडळाला कार्यालयात प्रवेश देत निवेदन स्वीकारण्यात आले.
पीएमआरडीएने एक दिवस आधीच कृती समितीला पत्र देत चाकण परिसरातील सुरु असलेल्या विकासकामांची माहिती दिली आणि मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र नागरिक व उद्योजकांचा संताप ओसरण्याऐवजी अधिकच वाढला आणि ठरल्याप्रमाणे मोर्चा निघाला.मोठ्या संख्येने चाकणमधील उद्योगपती, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले. चाकण औद्योगिक क्षेत्र देशासाठी उत्पादन करतं, पण आमचं स्वतःचं शहर वाहतूक कोंडीत गुदमरलंय, अशा शब्दांत आंदोलकांनी प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली.





