शातिर चैतन्यानंद स्वामीचा डाव: पोलिसांनाही सापडले नाही पुरावे, ‘डर्टी’ खेळात महिला वॉर्डनचाही सहभाग

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. वसंतकुंज येथील १७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला स्वामी चैतन्यानंद ऊर्फ पार्थ सारथी इतका शातिर आहे की, त्याने पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळू दिलेला नाही. आपल्या तिन्ही मोबाइल फोनमधील पीडित विद्यार्थिनींसोबतच्या चॅटिंग डिलीट करून त्याने पुरावे नष्ट केले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात महिला वॉर्डनचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. वॉर्डन विद्यार्थिनींना आरोपीकडे घेऊन जात नसल्या, तरी तक्रारीच्या वेळी त्या प्रकरण दाबण्याचे काम करत होत्या.
चॅटिंगचा पुरावा नाही, मोबाइल फोरेंसिक तपासणीसाठी –
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वामीने आपले तिन्ही मोबाइल फोन आणि आय-पॅडमधील सर्व चॅटिंग डिलीट केल्या आहेत. एका मोबाइलचा वापर तो संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्यासाठी करत होता. आता हे सर्व उपकरणे फोरेंसिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, जेणेकरून काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
यूएन नंबर प्लेटवरून बनला अनभिज्ञ –
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी चैतन्यानंदला जेव्हा त्याच्या गाडीवर लावलेल्या यूएन आणि दूतावासाच्या नंबर प्लेटबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने याबाबत अनभिज्ञता दाखवली. त्याने दावा केला की, या नंबर प्लेट ट्रस्टच्या असू शकतात आणि त्यांना कोणी लावल्या याची त्याला माहिती नाही. मात्र, आरोपीचा ड्रायव्हर विक्रम सिंह तोमर याने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्फोटक खुलासा केला आहे. विक्रमने सांगितले की, स्वामीच्या सांगण्यावरूनच तो गाडीवर यूएन आणि दूतावासाच्या नंबर प्लेट लावत असे. विशेषत: जेव्हा स्वामी व्हीआयपी किंवा दिल्लीबाहेर जात असे, तेव्हा अशा नंबर प्लेट लावण्याच्या सूचना त्याला मिळत होत्या.
वॉर्डनकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न –
तपासात असेही समोर आले आहे की, महिला वॉर्डन विद्यार्थिनींना आरोपीकडे घेऊन जात नव्हत्या. स्वामी स्वत:च विद्यार्थिनींना बोलावत असे. मात्र, जेव्हा कोणतीही विद्यार्थिनी तक्रार करण्याची धमकी देत असे किंवा प्रकरण बिघडत असे, तेव्हा वॉर्डन मध्यस्थी करून प्रकरण शांत करत होत्या. आतापर्यंतच्या तपासात असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत की, वॉर्डन स्वत: विद्यार्थिनींना आरोपीकडे घेऊन जात होत्या.
दिल्ली पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या शातिर डावपेचांमुळे पुरावे गोळा करण्यात अडचणी येत आहेत. तरीही फोरेंसिक तपासणीतून काही महत्त्वाचे पुरावे मिळण्याची आशा पोलिसांना आहे.
काय आहे प्रकरण?
स्वामी चैतन्यानंद सरस्वती (उर्फ पार्थ सारथी) हा ओडिशा येथील स्वयंघोषित धार्मिक गुरू आहे, जो दिल्लीतील वसंत कुंज येथील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च (SRISIIM) संस्थेचा मॅनेजर होता. या संस्थेत EWS कोट्यावरील १७+ महिला विद्यार्थिनींवर त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. अश्लील मेसेज, नको त्या ठिकाणी स्पर्श आणि CCTV द्वारे निरीक्षण यांचा समावेश आहे. तीन महिला वॉर्डननीही त्याला मदत केली. एअर फोर्स अधिकाऱ्याच्या ईमेलने हे प्रकरण उघडकीस आले. २००९ व २०१६ पासून पूर्वीचे गुन्हेही आहेत. २७ सप्टेंबर २०२५ रोजी आग्रा येथे त्याला अटक झाली असून ५ दिवसांची कोठडी मिळाली आहे. संस्थेच्या ३ खरब रुपयांच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आणि १८ कोटींची फसवणूकही उघड झाली आहे.





