Chairman of Municipal Council : नगरपरिषदेच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार आता सदस्यांना; फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आज राज्याच्या मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना (Chairman of Municipal Council) पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत.
नगर परिषदेचे अध्यक्ष हटविण्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
नगर परिषदेच्या अध्यक्षांना पदावरून कसे हटवले जात होते?
आजचा निर्णय होण्याच्या अगोदर नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. मात्र आजच्या निर्णयानंतर आता अध्यक्षांना पदावरून हटविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार देण्यात येणार आहे.
नव्या निर्णयानुसार नगर परिषदेच्या अध्यक्षांना पदावरून कसे हटवले जाणार?
निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नगराध्यक्षाचा (Chairman of Municipal Council) कालावधी अडीच वर्षाचा असतो. नगराध्यक्षावर आणला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास दूसरा अविश्वास ठराव किमान एक वर्ष आणता येत नाही. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान ५० टक्के नगरसेवकांची अनुमती लागत होती. परंतु आता दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून मतदानाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या अध्यक्षांना हटविण्याचा निर्णय घेता येणार आहे.




