कोंढवा : कोंढव्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित शिवनेरीनगर डीपी रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या कामाला गती मिळावी यासाठी माजी नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) कार्यकर्त्यांसह नरवीर तानाजी मालुसरे चौकात ज्योती हॉटेलजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. पुणे मनपा प्रशासन डीपी रस्त्याच्या कामाला सुरुवात करेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना ॲड. पठाण म्हणाले, “२००२ मध्ये ज्योती हॉटेल ते कुमार पृथ्वीपर्यंत डीपी रस्ता मंजूर झाला होता. मात्र, २३ वर्षांनंतरही हे काम पूर्ण झालेले नाही, हे मनपा प्रशासनाचे अपयश आहे. यामुळे गल्लीबोळात स्वच्छता वाहने जाऊ शकत नाहीत, ड्रेनेज लाईन टाकता येत नाही. परिणामी, घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन कोंढवावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे साखळी उपोषण सुरू केले आहे.” या आंदोलनात आमदार चेतन तुपे, मनसेचे पुणे शहरप्रमुख साईनाथ बाबर, राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, माजी नगरसेविका हाजी परवीन फिरोज, माजी नगरसेवक रईस सुंडके, आपच्या नेत्या रुबीना काझमी, ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज, नारायण लोणकर, इम्तियाज शेख, उबेद शाह, जावेद सय्यद, समीर बागवान, शाहिद राजा, मजहर काश्मिरी, जावेद पठाण, सलमान शेख यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी मनपा प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. कोंढवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. डीपी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार शिवनेरीनगर डीपी रस्त्याचे काम सध्या कुमार पृथ्वीकडून सुरू आहे. मात्र, काही घरांमुळे कामात अडथळा येत आहे. या नागरिकांचे पुनर्वसन करून जागा ताब्यात घेण्यासाठी मनपाच्या भूमी व जिंदगी विभागाकडे पथविभागाचा पाठपुरावा सुरू आहे. जागा ताब्यात मिळाल्यास एका महिन्यात काम मार्गी लागेल, अशी माहिती पथविभागाचे उपअभियंता आदिल तडवे यांनी दिली.