पुणे | मध्य रेल्वेचे पुणे स्टेशन सुपरफास्ट…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या लोकल, डेमू, पॅसेंजर या सर्व ट्रेन्सच्या उपनगर सबर्बन आणि नॉन-सबर्बन प्रवासीसंख्येत गतवर्षीपेक्षा यंदा मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा गेल्या सहा महिन्यांत तीन कोटी २७ लाख लोकांनी प्रवास केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४९ लाख प्रवासीसंख्या वाढली आहे. त्यातून रेल्वेला ३७० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणे विभागातून दररोज २०० ट्रेन्स धावतात. दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. दरम्यान, रेल्वेचे तिकीट दर कमी असल्याने प्रवाशांकडून कायम रेल्वेला पसंती दिली जाते. त्यामध्ये लोकल, डेमू आणि पॅसेंजर ट्रेन्सना प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र, त्या तुलनेत सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे गर्दीमध्ये धक्के खात प्रवासाशिवाय पार्याय नाही. करोना काळात दोन वर्षे रेल्वे सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र, २०२३ पेक्षा चालू वर्षी मात्र रेल्वेतून प्रवास करणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्न या दोन्हींची संख्या वाढत आहे.
ट्रेन्सची संख्या वाढवणे आवश्यक
पुण्यातून प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांत जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यात बिहार, पश्चिम बंगालमध्ये जाणार्या ट्रेन्सना बाराही महिने गर्दी असते.
या भागात जाणार्या ट्रेन्समध्ये गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. तसेच आरक्षित डब्यामध्ये प्रवासी शिरतात, त्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या भागात ट्रेन्स वाढविण्याची गरज आहे.
प्रवासी संख्या वाढल्यामुळे अनेक मार्गावर जादा ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा प्रवासी आणि रेल्वेला होत आहे. प्रवासी वाढल्यामुळे उत्पन्न देखील वाढले आहे. – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक





