पिंपरी | देवघर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

कार्ला, (वार्ताहर) – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वेहेरगाव केंद्राची पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद देवघर येथे संपन्न झाली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत केंद्र स्तरावर यंत्रणा कार्यरत करून शंभर टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने काम करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावर शिक्षण परिषद लाभदायक ठरते.
प्रगत शाळा, डिजिटल शाळा, एबीएल शाळा, आयएसओ अशा नामांकित शाळांमधील शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणधिकारी हे यामधे मार्गदर्शन करतात. केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषद घेतली जाते.
यामध्ये शंभर टक्के शाळा प्रगत करण्यासाठी, शाळाबाह्य मुले विरहित शाळा यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना नियोजन व उपाययोजना करून नियमित वाचन, स्वच्छता आदी उपक्रमांबाबत माहिती दिली जाते.
शिक्षण परिषदेच्या माध्यमातून केंद्रांतर्गत सर्व शाळा शंभर टक्के प्रगत करण्यासाठी चर्चा, नियोजन, कृती आराखडा तयार करून त्याप्रमाणे उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातात. देवघर येथील शिक्षण परिषदेला केंद्रप्रमुख सुहास विटे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, निपुण भारत, प्रज्ञा शोध परीक्षा,
विविध शिष्यवृती परीक्षा यावर्षी राबवण्यात येणारे नवनवीन उपक्रम तसेच विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी कशी करावी या विषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शैला तांबे, शैला सांडभोर, मनिषा कोल्हे, शितल हिवरकर यांनी देखील विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे यांनी तर आभार उपशिक्षिका शितल मुळीक यांनी मानले.





