नवी दिल्ली – केंद्र सरकारचे बरेच मंत्री आता झोहा मेलचा वापर करीत आहेत. प्राप्त माहितीनुसार सध्या केंद्र सरकारच्या विविध विभागातील बारा लाख कर्मचार्यांनी झोहो मेलवरून काम करण्यास सुरुवात केली आहे. ओपन सोर्स अॅपलिकेशन आधारित मेल वापरण्याच्या ऐवजी देशांतर्गत विकसित झोहो मल जास्त विश्वासार्ह असल्याचे केंद्र सरकारला वाटते. त्यामुळेच सरकारच्या सूचनेनुसार कर्मचारी झोहो मेल वापरत असल्याचे दिसून येते. ही प्रक्रिया गेल्या बारा महिन्यापासून चालू आहे. जे कर्मचारी झोहो मेल वापरतात त्यामध्ये पंतप्रधान कार्यालयातील कर्मचार्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. झोहो कंपनी विविध डिजिटल उत्पादने तामिळनाडूतील तेनसाखी या खेड्यात विकसित करीत आहे. 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आपल्या विभागातील अधिकार्यांना झोहो डिजिटल उत्पादने वापराची सूचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर सरकारी अधिकारी व राज्य सरकारचे कर्मचारी ही उत्पादने वापरण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने आमच्या यंत्रणेची पूर्ण तपासणी केली आहे. आमची यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच केंद्र सरकारचे कर्मचारी ही उत्पादने वापरत असल्याचे झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी सांगितले. वेम्बू यांची 2021 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपण झोहोच्या सेवा वापरत असल्याची माहिती समाज माध्यमावर दिली आहे. भारतीय नागरिकांनी या डिजिटल उत्पादनाचा वापर करावा आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित होण्यास चालना द्यावी असे आवाहन केले आहे. ई-मेल बरोबर झोहो कंपनीकडून व्हाट्सअॅपला पर्याय उपलब्ध करण्यात आला असून या सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.