केंद्र सरकारचा ट्विटरच्या कृतीवर तीव्र आक्षेप; ‘तो’ टॅग हटवण्याची स्पष्ट सूचना

नवी दिल्ली -वादग्रस्त ठरलेल्या एका टूलकिटबाबत ट्विटरने केलेल्या कृतीवर केंद्र सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. तसेच, त्या टूलकिटवरील टॅग हटवण्याची सूचनाही ट्विटरला करण्यात आली.
करोना संकटाच्या हाताळणीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट बनवल्याचा आरोप नुकताच भाजपकडून करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सरकारच्या बदनामीसाठी कॉंग्रेसने ते टूलकिट तयार केल्याचा आरोप ट्विटद्वारे केला. मात्र, ते टूलकिट बनावट असल्याची तक्रार कॉंग्रेसने पोलिसांत दिली.
एवढेच नव्हे तर, ट्विटरकडेही तक्रार नोंदवली. त्यानंतर पात्रा यांचे ट्विट बनावटगिरीचे किंवा हेराफेरी करणारे (मॅनिप्युलेटेड मीडिया) असल्याची टिप्पणी (टॅग) ट्विटरकडून करण्यात आली. ट्विटरच्या त्या टॅगकडे पात्रा यांच्यासाठी झटका म्हणून पाहिले गेले.
त्यापार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ट्विटरच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना ट्विटर कुठला निकाल देऊ शकत नाही. ट्विटरवरील मजुकराची सत्यता तपासातून स्पष्ट होईल. त्या तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये, असे पत्र केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ट्विटरला धाडण्यात आले.





