करोनाचा धोका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून “आरोग्यसेतू’ ऍप सुरू

नवी दिल्ली: “कोविड-19’शी लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज केंद्र सरकारने खासगी-सरकारी सहकार्यातून विकसित केलेले आरोग्यसेतू नावाचे नवे ऍप सुरू केले. हे ऍप प्रत्येक नागरिकाला करोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते. अत्याधुनिक “ब्लू टूथ’ तंत्रज्ञान आणि “आर्टिफिशियल इंटिलीजन्स’चा वापर करून हे ऍप प्रत्येक व्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तींशी होणारे व्यवहारांचा आधार घेऊन करोना संसर्गाच्या धोक्याची पातळी निश्चित करेल.
कुठल्याही व्यक्तीने त्याच्या स्मार्ट फोन मध्ये एकदा हे ऍप घेतल्यानंतर अत्यंत सोप्या आणि वापरासाठी सुलभ क्रियांमधून ते परिसरातील आरोग्यसेतू असलेले इतर फोन ओळखून घेते. या फोनपैकी कुणाचा वापरकर्ता “कोविड-19′ संसर्गाने बाधित असेल तर हे ऍप धोक्याची पातळी ठरविते.
या ऍपने गोळा केलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून भविष्यात केव्हाही आरोग्य विभागाला गरज लागली तर ती फोनमधून उपलब्ध होऊ शकेल. हे ऍप 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.





