Government Holiday List : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2027 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर; होळी, दसरा आणि दिवाळीच्या तारखा पाहा!
Government Holiday List : केंद्र सरकारने २०२७ च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. होळी, दसरा, दिवाळीच्या तारखा, ऐच्छिक सुट्ट्या आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचे नियम जाणून घ्या.

Government Holiday List : केंद्र सरकारने २०२७ या वर्षासाठी केंद्रीय सरकारी कार्यालयांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) १६ जुलै २०२६ रोजी यासंदर्भात कार्यालयीन आदेश काढला आहे. त्यानुसार, दिल्ली आणि नवी दिल्लीतील केंद्रीय सरकारी कार्यालयांना वर्षभरात १७ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. याशिवाय कर्मचारी आपल्या पसंतीच्या दोन ऐच्छिक सुट्ट्या घेऊ शकतील. दिल्लीबाहेरील केंद्रीय सरकारी कार्यालयांसाठी १४ निश्चित सुट्ट्या आणि राज्यस्तरावर निवडलेल्या तीन अतिरिक्त सुट्ट्या असतील.
२०२७ मध्ये प्रमुख सणांच्या सुट्ट्या कधी?
सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार, २०२७ मध्ये होळी २३ मार्चला, रामनवमी १५ एप्रिलला, जन्माष्टमी २५ ऑगस्टला, दसरा ९ ऑक्टोबरला आणि दिवाळी २९ ऑक्टोबरला आहे. याशिवाय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, गुड फ्रायडे २६ मार्च, स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आणि गांधी जयंती २ ऑक्टोबरला आहे.
दिल्ली आणि नवी दिल्लीतील सुट्ट्यांची यादी
दिल्ली आणि नवी दिल्लीतील केंद्रीय सरकारी कार्यालयांसाठी एकूण १७ सार्वजनिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
| सण किंवा दिवस | तारीख |
|---|---|
| प्रजासत्ताक दिन | २६ जानेवारी |
| ईद-उल-फित्र | १० मार्च |
| होळी | २३ मार्च |
| गुड फ्रायडे | २६ मार्च |
| रामनवमी | १५ एप्रिल |
| महावीर जयंती | १९ एप्रिल |
| बकरीद | १७ मे |
| बुद्ध पौर्णिमा | २० मे |
| मोहरम | १६ जून |
| स्वातंत्र्यदिन | १५ ऑगस्ट |
| ईद-ए-मिलाद | १५ ऑगस्ट |
| जन्माष्टमी | २५ ऑगस्ट |
| गांधी जयंती | २ ऑक्टोबर |
| विजयादशमी (दसरा) | ९ ऑक्टोबर |
| दिवाळी | २९ ऑक्टोबर |
| गुरुनानक जयंती | १४ नोव्हेंबर |
| नाताळ | २५ डिसेंबर |
दिल्लीबाहेरील कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या?
दिल्ली आणि नवी दिल्लीबाहेरील केंद्रीय सरकारी कार्यालयांना १४ सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती, बुद्ध पौर्णिमा, नाताळ, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरुनानक जयंती, ईद-उल-फित्र, बकरीद, महावीर जयंती, मोहरम आणि ईद-ए-मिलाद यांचा समावेश आहे.
याशिवाय १२ पर्यायांमधून तीन अतिरिक्त सुट्ट्या निवडल्या जातील. यासाठी प्रत्येक राज्याच्या राजधानीतील केंद्रीय सरकारी कर्मचारी कल्याण समन्वय समिती निर्णय घेईल. होळी, रामनवमी, जन्माष्टमी, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, मकरसंक्रांत, रथयात्रा, ओणम, पोंगल, वसंत पंचमी आणि इतर प्रादेशिक सणांचा या पर्यायांमध्ये समावेश आहे. एकदा अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
कर्मचाऱ्यांना दोन पसंतीच्या सुट्ट्या घेता येणार
दिल्ली आणि नवी दिल्लीतील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुट्ट्यांच्या यादीतून कोणत्याही दोन सुट्ट्या निवडता येतील. यामध्ये नवीन वर्ष, मकरसंक्रांत, पोंगल, वसंत पंचमी, शिवजयंती, संत रविदास जयंती, महाशिवरात्री, होलिका दहन, गुढीपाडवा, बैसाखी, रथयात्रा, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी आणि ओणम यांचा समावेश आहे.
तसेच ऑक्टोबरमध्ये दुर्गाष्टमी, महानवमी, वाल्मीकी जयंती, करवा चौथ, नरक चतुर्दशी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यांसारखे पर्याय आहेत. नोव्हेंबरमध्ये छठपूजा आणि गुरू तेगबहादूर यांचा शहीद दिन, तर डिसेंबरमध्ये हजरत अली यांची जयंती आणि नाताळच्या पूर्वसंध्येचा पर्याय उपलब्ध आहे.
रविवारी किंवा शनिवारी सुट्टी आल्यास काय?
एखादा सण शनिवारी, रविवारी किंवा कार्यालय बंद असण्याच्या दिवशी आल्यास त्याबदल्यात दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार नाही. २०२७ मध्ये स्वातंत्र्यदिन आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सुट्ट्या १५ ऑगस्ट या रविवारी आल्या आहेत. गांधी जयंती, दसरा आणि नाताळ या सुट्ट्या शनिवारी आहेत.
चंद्रदर्शनानुसार बदलू शकतात चार सुट्ट्या
ईद-उल-फित्र, बकरीद, मोहरम आणि ईद-ए-मिलाद या चार सणांच्या सुट्ट्यांच्या तारखा चंद्रदर्शनानुसार बदलू शकतात. त्यानुसार केंद्र सरकार किंवा संबंधित राज्यस्तरीय समिती सुट्टीच्या तारखेत बदल करू शकते.
काही राज्यांत दिवाळीची सुट्टी २८ ऑक्टोबरला
२०२७ मध्ये दिवाळी २९ ऑक्टोबरला, शुक्रवारी आहे. मात्र काही राज्यांमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाते. संबंधित राज्य सरकारने त्या दिवशीच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर केली असल्यास त्या राज्यातील केंद्रीय सरकारी कार्यालयांनाही २८ ऑक्टोबरला सुट्टी देता येईल.
बँका आणि औद्योगिक कार्यालयांसाठी वेगळे नियम
केंद्र सरकारच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि व्यापाराशी संबंधित आस्थापनांना वर्षभरात जास्तीत जास्त १६ सुट्ट्या देता येतील. त्यामध्ये तीन राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश असेल. उर्वरित सुट्ट्या संबंधित आस्थापना ठरवू शकतील. बँकांच्या सुट्ट्या मात्र केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या नियमांनुसार निश्चित केल्या जातील.
दरम्यान, ही यादी केंद्रीय सरकारी प्रशासकीय कार्यालयांसाठी आहे. महाराष्ट्र शासनाची कार्यालये, खासगी कंपन्या आणि बँकांसाठी सुट्ट्यांचे नियम वेगळे असू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाची अधिकृत सुट्टीची यादी तपासावी.





