बर्ड फ्ल्यु प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची केंद्राची राज्यांना सुचना

नवी दिल्ली – देशातल्या चार राज्यांमध्ये एच ५ एन १ विषाणूची प्रकरणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वच राज्यांना या संबंधात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने २० मे रोजी सर्व राज्यांसाठी या विषाणुच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी ही सुचना जारी केली आहे.
एव्हीयन इन्फ्लूएंझा किंवा बर्ड फ्लूच्या प्रकरणांची व्याख्या, आणि लक्षणे यावर सर्व राज्यांच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना आणि खाजगी व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच राज्यांना पाळीव पक्षी/कुक्कुट पालन केंद्रातील कोणत्याही असामान्य मृत्यूबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि आढळल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला ताबडतोब सादर करण्यास सांगितले आहे.
राज्यांना सर्व पोल्ट्री आस्थापना, प्राणीसंग्रहालय आणि बाजारपेठेतील जैवसुरक्षा उपाय मजबूत करण्यास सांगितले आहे, संपूर्ण मूल्यांकन करण्याची व सर्व पोल्ट्री फार्मवर सर्वसमावेशक जैवसुरक्षा मूल्यांकनाची शिफारस करण्यात आली आहे.
वन्य पक्षी आणि पाळीव कुक्कुटपालन यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या पाहिजेत, असे त्यात म्हटले आहे. मृत किंवा आजारी पक्षी उघड्या हातांनी हाताळणे आणि पुरेशा श्वसन संरक्षणाशिवाय त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्राने राज्यांना पुरेशा प्रमाणात अँटीव्हायरल औषधे (ओसेल्टामिव्हिर), पीपीई आणि मास्कचा साठा करणे यासारख्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव आढळून आला आहे तेथेही आवश्यक त्या खबरदारींचे उपाय करण्यास सांगण्यात आले आहे.





