दहा हजार रूपये विकास मंडळाकडे वर्ग करण्याचा मुद्दा ठरणार पुन्हा कळीचा
अहमदनगर: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची शताब्दी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.15) सकाळी 10 वाजता नंदनवन लॉन येथे होत आहे. सभासदांच्या कायम ठेवीतून दहा हजार रूपये विकास मंडळाकडे वर्ग करण्याचा मुद्दाच पुन्हा या सभेत कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.
आम्ही सभासदभिमुख निर्णय धेतले आहेत. त्यामुळे सभासद आमच्यासोबत आहेत.सभा शांततेत पार पडेल अर्थात विरोधकांनी गोंधळ घातला नाही तर असे सत्ताधारी बापू तांबे प्रणित गुरुमाऊली मंडळाचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे सर्वच विरोधी मंडळांनी चुकीचे निर्णय होऊ न देण्याचा इशारा देताना रावसाहेब रोहकले यांच्या काळात विकास मंडळाच्या इमारतीसाठी वर्ग करण्यात येणार्या ठेवीला विरोध केला आहे.
ठेवी ऐच्छिक नको व सक्तीने पण वर्ग नको असे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेच कर्जावरील व्याजदर कमी करावेत,अनावश्यक खर्च कमी करावेत,नाहक जागा खरेदी करू नये अशा विविध मागण्यांवर विरोधकांनी सत्ताधार्यांना घेरण्याची रणनिती आखली आहे. आज सर्वच प्रमुख मंडळांसह सत्ताधारी गटाची आमसभा झाली. तसेच सायंकाळी उशिरा संचालक मंडळाची बैठकही झाली. त्यात विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची व आपली धोरणे मांडायची यावर चर्चा झाली.
गृहकर्ज सुरू करणार,
कायम ठेव व्याजदर पोटनियम करणार, कर्जमर्यादा वाढ करणार असा निर्णय सत्ताधारी गटाने रात्री उशिरा पर्यन्त चालेल्या आमसभेत घेतला.